जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची ठाण्याला बदली
आचारसंहितेत बदली झाल्याने आश्चर्य : नगरला अद्याप कोणाची नेमणूक नाही
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी मंंगळवारी (दि. २१) काढले आहेत.
सन २०१८ चे आयएएस अधिकारी असणारे आशिष येरेकर हे ६ मे २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू झालेे होते. त्यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी नगरला जिल्हा परिषदेवर प्रशासन म्हणून कामकाज पाहिले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली नसताना व येरेकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना बदलीचे आदेश निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बदलीबाबत येरेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे ते बदलीच्या ठिकाणी रूजू होणार की नाही याबाबत माहिती समजू शकली नाही.
दरम्यान, येरेकर यांच्या जागी कोण बदलून येणार याबाबत मात्र शासनाकडून आदेश निघालेले नाहीत. तसेच त्यांच्या जागी प्रभारी म्हणून पदभार कोणाकडे दिला जाणार, याबाबतही बुधवारी सायंकाळपर्यंत विभागीय आयुक्तांकडून कोणत्याच्या सूचना आलेल्या नव्हत्या.