अहमदनगर-जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे ग्रहण काही सुटताना दिसत नाही. दुसर्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छूक उमेदवारांचा पुरता गोंधळ उडाला आहे. नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून पुढील वेळापत्रक प्राप्त होताच कळवले जाईल, असा खुलासा जिल्हा परिषद संकेतस्थळावर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 मधील सुमारे 19 हजार पदांच्या भरतीसाठी राज्यात 7 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. नगर जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गातील 937 पदांचा यात समावेश आहे. प्रारंभी ही परीक्षा 3 ऑक्टोबरपासून होणार होती. परंतु तयारी झाली नसल्याचे कारण देत 7 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 7 ते 11 अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. तोपर्यंत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते.
अखेर दुसर्या टप्प्यातील 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. यातील 17 ऑक्टोबरपर्यंत पेपर झाले. परंतु अचानक पुढील परीक्षा रद्द होत असल्याचे कंपनीने कळवल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 23 तारखेपर्यंत पेपर होेणे गरजेचे होते. परंतु कंपनीने तांत्रिक कारण देत पुढील परीक्षाच रद्द केली आहे. त्यामुळे या परीक्षेतील सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर काहीतरी तांत्रिक कारण देत परीक्षेचा बोजवारा उडत आहे.
18 ते 23 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा तूर्तास स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या लिंकवरून पुढील परीक्षांचे प्रवेशपत्रही डाऊनलोड होत नाही. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंकच बंद करण्यात आली असल्याने राज्यात सर्वच जिल्हा परिषदांमधील पुढील पदांची परीक्षा तूर्तास स्थगित झाली आहे.
सध्याचे वेळापत्रक स्थगित झाले असले तरी कंपनीकडून पुढील वेेळापत्रक जाहीर होताच उर्वरित संवर्गातील पदांच्या परीक्षा होतील.दरम्यान, आज सचिवांची ऑनलाईन व्हीसी असून त्यात भरतीच्या लेखी परीक्षेबाबत पुढील सुचना मिळतील, त्यानूसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
– राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन