अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेमध्ये आंतर जिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्वाचे तसेच घटस्फोटाचे खोटे दाखले सादर करून बदली करून घेणाऱ्या शिक्षक,शिक्षिका यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी येथील विकास भाऊसाहेब गवळी राहणार भिस्तबाग,
अहमदनगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज द्वारे मागणी केली होती. याबाबत जिल्हा परिषदेकडे देखील अनेक संस्था व संघटना यांनी निवेदने सादर केली होती,मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता,मात्र आता गवळी यांनी केलेल्या अर्जानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सदर अर्जाचा तपास कोतवाली पोलिसांकडे दिला असून कोतवाली पोलीस स्टेशनने याबाबत आता जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांकडे माहिती मागितली आहे.त्यामुळे ज्यांनी अशा प्रकारचे दाखले देऊन बदल्या करून घेतल्या असे शिक्षक हवालदिल झाले आहेत.
2017 व 2022 साली झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये काही शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले दिले तसेच महिला शिक्षकांनी घटस्फोट घेतल्याची खोटी कागदपत्रे सादर करून आपली बदली करून घेतली.मात्र ज्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला त्याच्याबरोबर आजही त्यांचा संसार चालू आहे. ही बाब सर्व जिल्ह्याला माहिती आहे. मात्र याबाबत आत्तापर्यंत कोणी लेखी तक्रार केली नव्हती.पण श्री गवळी यांनी याबाबत पुढाकार घेऊन थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून संशयतांची नावे देखील त्यांनी दिली होती. त्यावरून अशा दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी आहे.त्यांचे अर्जानुसार कोतवाली पोलिसांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे उपरोक्त काळात आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या सर्व शिक्षकांची यादी मागितली असून त्यांच्या बदलीचे कारण देखील विचारले आहे.
या कारवाईमुळे बोगस पद्धतीने बदल्या करून घेणाऱ्या शिक्षकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये 76 शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देऊन अपंग योजनेचा लाभ घेतला होता तसेच बदल्या ही करून घेतल्या होत्या. त्याबाबत तक्रार झाल्यानंतर त्याची चौकशी होऊन सर्व दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली. काहींना जेलची हवा देखील खावी लागली तर काहींचे निलंबन देखील झाले. सदर प्रकरण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असून त्याबाबतही अद्याप पुढील कारवाई झालेली नाही. बोगस अपंग दाखल्याच्या या प्रकारामध्ये जिल्ह्यातील काही दिग्गज शिक्षक नेत्यांचा देखील समावेश होता.
आंतरजिल्हा बदल्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे बोगस अपंगत्व व महिला शिक्षकांनी बोगस घटस्फोट दाखवून बदल्या करून घेतल्याची प्रकरणे जिल्ह्यात चर्चेत आहेत.परंतु याबाबत कोणी पुढाकार घेऊन तक्रार करीत नसल्याने कारवाई केली जात नव्हती.मात्र आता विकास गवळी यांनी नावानिशी तक्रार करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात संशयित शिक्षकांची नावे देखील असल्याचे समजते.कोतवाली पोलिसांनी याबाबत आता शिक्षण विभागाकडे माहिती मागितली असून यासंदर्भात पुढील कार्यवाही काय होणार याकडे जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘त्या’ शिक्षकांवरही होणार कारवाई ?
अपंगत्व व घटस्फोट प्रकरणात खोटे दाखले देऊन बदल्या करून घेतल्याची तक्रार झाली असतांनाच जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये देखील काही महिला शिक्षिकांनी परितक्त्या असल्याचे खोटे दाखले देऊन आपल्या बदल्या करून घेतले आहेत अशा महिला शिक्षिका सुद्धा आजही आपल्या नवरोबांबरोबर राहत आहेत.त्यांच्याबद्दलही आता नावानिशी तक्रारी होणार असल्याचे समजते.त्याचबरोबर
2005 ते 2015 दरम्यान हिंदी साहित्य संमेलन ईलाहाबाद येथून शिक्षा विशारद ही बीएड समकक्ष असलेली परंतु बंद झालेली पदवी घेऊन जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी पदवीधर म्हणून वेतनश्रेणी घेतली आहे.त्यातील काही शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख होऊन निवृत्त झाले आहेत.काही अद्यापही सेवेत आहेत. त्या बोगस पदवीच्या आधारे वेतनश्रेणी व इतर आर्थिक लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या विरुद्ध देखील कारवाई करावी अशी देखील मागणी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. याबाबतही आता पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याचे समजते.त्यामुळे त्या सर्व शिक्षकांवर देखील कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक अशा पद्धतीने खोटे दाखले देऊन लाभ घेत असल्याने या शिक्षकांबद्दल वेगवेगळी चर्चा जिल्ह्यात होत आहे.
जिल्हा परिषद शिक्षक बनावट अपंग प्रमाणपत्र, आता ‘त्या’ शिक्षकांच्या पोलिस मागावर!