नगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून, त्यांच्या शिक्षक संघटना समन्वय समितीने ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा व सर्व सरकारी ‘व्हॉट्स अप ग्रुप’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ५ सप्टेंबरच्या, शिक्षक दिनावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
समन्वय समितीचे रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, सुनील बनोते, कल्याण लवांडे, राजेंद्र निमसे, राजेंद्र ठोकळ, डॉ. संजय कळमकर यांनीही माहिती दिली. मोर्चासाठी प्राथमिक शिक्षकांच्या १५ संघटना एकत्र आल्या आहेत. या संदर्भातील निवेदनात समितीने नमूद केले, की राज्य सरकार रोज नवे उपक्रम शिक्षकांकडून राबवून घेतले जातात. उपक्रमांचे छायाचित्र व माहिती लिंकवर पाठवा, व्हॉट्स अपद्वारे वारंवार माहिती भरा, विविध सर्वेक्षण करा, अशी अनेक अशैक्षणिक कामे असताना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हा परिषद राबवत असलेले उपक्रम रद्द करून केवळ ‘आम्हाला शिकवू द्या’ या मागणीसाठी शिक्षक समितीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार शासनमान्यतेशिवाय कोणतेही उपक्रम जिल्हा विभागाने घेऊ नयेत, तसेच खासगी संस्थेचे अॅप वापरू नये अशा सूचना आहेत. तरीही जिल्हा परिषदेकडून शिक्षकांवर उपक्रमांचा जास्तीचा मारा केला जातो. प्रशासकीय यंत्रणा असतानाही खासगी अॅपद्वारे शिक्षकांना क्यूआर कोड हजेरी सक्ती करणारे पत्र काढले आहे, नाहीतर वेतन अदा न करण्याची नियमबाह्य धमकीवजा सूचनाही दिली आहे. यामुळे शिक्षकांची खासगी माहिती सार्वजनिक होऊन फसवणुकीचा धोका निर्माण होणार आहे. ‘मिशन आरंभ’ या शिष्यवृत्ती उपक्रमाला शिक्षकांचा विरोध नाही. परंतु ही योजना दडपशाहीने राबवण्यावर प्रशासनाचा भर आहे. मुळात शिष्यवृत्ती फक्त हुशार मुलांसाठी असताना सरसकट शंभर टक्के मुले बसवण्याची सक्ती केली जाते. अपुरे शैक्षणिक साहित्य पुरवून जास्त निकालाची अपेक्षा केली जाते. कोणताही उपक्रम राबवताना संघटनांना विश्वासात घेतले, तर शिक्षकांची सकारात्मक दृष्टी तयार करण्याचे काम संघटना करतात. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी कधीही संघटनांशी संवाद साधत नाहीत. परस्पर उपक्रम राबवतात. पुन्हा उपस्थितीच्या नव्या पद्धती आणून अविश्वास दाखवतात, वर गुणवत्तेच्या अपेक्षा धरतात. हे तर्कट जिल्हा सहन करणार नाही. ‘आम्हाला शिकवू द्या’ या उद्देशाने मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे समितीने नमूद केले आहे.