प्रतिनिधी : चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली. यावेळी मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दणाणून सोडली. त्यामुळे प्रत्यक्ष महासभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली. यानंतर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, गणेश आपरे, अलतमश जरीवाला, सुनीता भाकरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, विकास भिंगारदिवे, सुनील क्षेत्रे, गणेश चव्हाण, रियाज सय्यद, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, सोफियान रंगरेज, विनोद दिवटे, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रति महासभेत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून महासभेचा निषेध केला.
शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार, व्यापारी यांच्याशी निगडित असणाऱ्या जाचक व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा विषय महासभेच्या अजेंडावर चर्चेसाठी सुद्धा नमूद करण्यात आलेला नाही. त्याचाही निषेध यावेळी किरण काळे यांनी केला. दुकानदार व्यापाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्यावर गदा आणणारा निर्णय महासभेने मंजूर केला होता. त्याला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करून देखील या निर्णयाला मागे घेण्यासंदर्भात तत्परता महासभा अजेंड्यावर दाखवण्यात आली नाही. याचे उत्तर दुकानदार, व्यापाऱ्यांनी येत्या सार्वत्रिक मनपा निवडणुकीत अशांना द्यावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मनपाचा निषेध, भ्रष्टाचाराचा निषेध, स्मशानभूमी खरेदी घोटाळा, पथदिवे घोटाळा, भूखंड वाटप घोटाळा, रस्ते घोटाळा, श्वान निर्बीजीकरण घोटाळा घोटाळा यांच्या निषेदांच्या फलकांसह घोटाळेबाज मनपाचा निषेध, नगरकरांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या महासभेचा निषेध असे फलक झळकवले.
प्रति महासभेत बोलताना किरण काळे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळाचे पोस्टमार्टम करत जोरदार हल्लाबोल केला. काळे म्हणाले, या पाच वर्षात पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी, भाजपच्या अभद्र युतीची सत्ता होती याच काळात सर्वाधिक घोटाळे महानगरपालिकेत घडले. त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये सत्तेचा रिमोट कंट्रोल हा शहर लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या हातामध्ये होता. त्यामुळे संपूर्ण पाच वर्षांच्या कालखंडामध्ये नगर शहर रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे, गटारी यासारख्या मूलभूत सोयी सुविधांच्या अभावा मुळे त्रस्त झाले.