शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी बोलून दाखवली आहे.या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केले होते. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये पक्ष पळवण्याची स्पर्धा सुरु आहे. पण वेळ आल्यावर शरद पवार हे शेवटचा डाव टाकतील, असे वक्तव्य करुन जयंत पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार सुजय विखे-पाटील यांनी खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. ते गुरुवारी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील हे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटचा डाव टाकतील, असे म्हणतात. पण जयंत पाटील हेच शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत, ते विचारुन घ्या. नाहीतर शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकायचे, अशी मिश्कील टिप्पणी सुजय विखे यांनी केली. शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाजप खासदार सुजय विखे यांनी आता कॉंग्रेस पक्षच काही दिवसांनी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले.