ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी नवा वाद निर्माण केला. लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. अर्थात ही घोषणा लोकसभेच्या पटलावरुन काढून टाकण्यात आली आहे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. संसद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे निवडणूक लढवणारा व्यक्ती भारतीय नागरीकच हवा. तसेच शपथ घेताना त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, ‘कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल.’ आता ओवैसी यांनी शपथ घेताना दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे हा प्रकार संसद नियमाचे उल्लंघन करणारा आहे. नियमानुसार, ओवैसी यांनी दुसऱ्या देशासंदर्भात निष्ठा दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते.