गेल्या काही दिवसांपासून शिरूर मतदारसंघावरून राजकारण सुरू आहे. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे जिंकून आले होते. परंतु, ते जिंकून येण्याकरता अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी मेहनत घेतली होती, असं अजित पवार गटाकडून बोललं जात आहे. तसंच, आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार उभा करणार असल्याचा थेट इशारा अजित पवारांनी दिला होता. यामुळे अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं. यावरून अजित पवार खासदारांना धमक्या देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
“अजित पवार यांचा धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा आहे. ते उघड धमक्या देतात हे जनतेला दिसून येत आहे. त्यांनी आजपर्यंत तेच केलं आणि शरद पवारांची जवळची चांगली चांगली माणसं त्यांनी तोडून टाकली. ही त्यांची दादागिरी आहे. वर्षानुवर्षे त्यांनी पक्षात दादागिरीच केली”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“अजित पवारांनी निर्माण केलेली दहशत आणि दरारा याचा त्यावेळेस मी बळी पडलो. एकिकडे अजित पवार यांच्याकडून त्रास दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून होणारी अडवणूक यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणजे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात वाईट अवस्था माझी होती”, अशी खंत आव्हाड यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉईंट’ या पॉडकास्टमध्ये बोलून दाखविली.