पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यासह संपूर्ण देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
पुण्यातील घटनेवर मी लक्ष ठेऊन आहे. माझं यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. खरं तर कारण नसताना असा प्रकाराच गैरसमज केला जातो की यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही. मुळात मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही. २१ तारखेला ही घटना घडली तेव्हा मंत्रालयात होतो की नाही, हे कोणीही जाऊन बघू शकतो”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
याप्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही. ही घटना गंभीर आहे. याप्रकारच्या घटना यापुढे घडू नये. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांची जबाबदारी आहे. याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, यासंदर्भातील मी वेळोवेळी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेत आहे. आज सकाळीसुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली”, असेही ते म्हणाले.