राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा केला होता. अशाचप्रकारचा दावा आता अजित पवार गटाने केला आहे. पक्षचिन्ह आणि पक्षनावावर दावा करत अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले.
३० जून २०२३ तारीख असलेले पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. यामध्ये १९६८ च्या पॅरा १५ अंतर्गत एक याचिका प्राप्त झाली आहे. ३० खासदार आमदार आणि एमएलसी यांची ४० प्रतिज्ञापत्रे या याचिकेतून करण्यात आली आहेत. तसंच, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठरावही निवडणूक आयोगाला प्राप्त झाला आहे.