शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांनी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देखील मिळवलं. मात्र, आता भाजपनेच अजित पवार गटाचे आमदार फोडण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात झारखंडमधून झाली आहे. झारखंडचे अजित पवार गटाचे एकमेव विद्यमान आमदार कमलेश सिंह यांना भाजपने आपल्या गळाला लावलं आहे.
३ ऑगस्ट रोजी कमलेश सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी एकमेव पक्ष सोडून जात असल्याने झारखंडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडणार आहे. कमलेश सिंह हे हुसेनाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष आहेत.
आमदार कमलेश सिंह पलामूच्या हुसेनाबादचे विद्यमान आमदार असून पक्षाच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत. त्यांनी मंत्रिपद देखील भूषवलं आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही आगामी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याआधी कमलेश सिंह यांनी घड्याळ सोडून कमळ हातात घेण्याची तयारी सुरु केली आहे.