राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. सध्या अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून आज ते काटोलमध्ये दाखल झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवार मेळावा घेणार आहेत. बाईक रॅलीच्या माध्यमातून अजितदादा काटोलमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात अजित पवार हे महिला आणि शेतकऱ्यांची साधणार संवाद साधणार आहेत. दरम्यान, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने काटोल मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा सांगितलाय.
यावेळी माध्यमांसोबत बोलताना अजित पवार म्हणाले “जिथे जिथे तिथे उमेदवार मागच्या वेळी निवडून आले होते तिथे-तिथे आम्ही जातोय. आज काटोल आणि नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी वितरण करणार आहे. उद्या वरुड मोर्शी पुसद याठिकाणी आम्ही जाणार आहोत.”
“आतापर्यंत आमचा एक राऊंड झालेला आहे. आम्ही सर्वच एकत्रपणे निवडणूक लढणार आहोत. साधारणता 288 मतदार संघाचा विचार करून एकमत करू. ज्यावेळी जागा निश्चित होतील. त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू, इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे”, असं म्हणत अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
“कुणी काहीही टीका केली तरी मला काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी कामाचा माणूस आहे आणि अर्थसंकल्पातून सर्व समाजाला जनतेला चांगले देण्याचं काम केलं आहे”, असंही अजित पवार म्हणाले.