खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पहाटे शिरूर लोकसभा मतदारसंघाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकासकामांचा देखील आढावा घेतला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आम्ही आमचा निर्णय घेणार, शिरूरबाबत मी जे बोललो तेच फायनल, असं ठाम मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
काल दिलेल्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्यासोबत काही संबंध नाही. माझा दौरा नियोजित होता, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेतील गोंधळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार अमोल कोल्हे यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे.
या विरोधात किल्ले शिवनेरी जुन्नर येथे मोर्चा काढण्यात येणार असून पुण्यात देखील सभा घेतली जाणार आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असून महायुती सरकारमध्ये सामील आहेत. पुण्यात शरद पवार गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याने खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्या निशाण्यावर आले आहेत. शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे.