लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादांचा’ घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा.
बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली. मेडीकल कॉलेज न मागता मिळले. आयुर्वेदीक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदार संघात ७५०कोटींची कामे चालू आहेत.
दरम्यान, आजपर्यंतच्या कारकिर्दीवर आपण समाधानी असलयाचं अजित पवार यावेळी म्हणाले. “आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.