देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ समजला जातो. अशातच अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यानं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (15 जानेवारी 2024) वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंना अकोल्याची जागा तुम्ही मागणार का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांना तुमचा पाठिंबा आहे का? असं विचारलं असता, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास, आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.
रामदास आठवलेंनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला टोलाही लगावला आहे. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला बारा बारा जागांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीनं स्विकारावा, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे. तसेच, जर त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला स्विकारला, तर आम्हाला त्यांचे बारा वाजवण्यात यश येईल, असा टोला रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.