राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या महायुतीचं सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. दोघेही अजितदादांना अत्यंत सुनियोजितपणे ‘साइड ट्रॅक’ करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं अकोला येथे त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला
महायुतीमध्ये अजितदादांचं मोठं खच्चीकरण सुरू आहे. प्रत्येक निर्णयाच्या वेळी अजित पवार यांना हे दोन्ही नेते एका बाजूला का काढतात, हे कळेनासं झालय. अलीकडेच दादांनी दिल्ली दौरा केला. अचानक ते दिल्लीला गेल्यानं नेमकं काय चाललं असेल, याचा अंदाज केला जाऊ शकतो, असं देशमुख म्हणाले. सरकारमध्ये कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.