अकोले तालुक्यातील चेरापुंजी असलेल्या भंडारदरा परिसरात दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी देखील संभाव्य गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाहतुकीत बदल केला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी सोमवारी (दि. 12 ऑगस्ट) काढले आहेत. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसूबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, वाल्मिकऋषी आश्रम कोदणी आदी पर्यटनस्थळे आहे.
येथील रस्ते अरुंद आणि पावसामुळे खराब झालेले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्राप्त अधिकारानुसार रंधा फाटा येथून भंडारदर्याकडे जाणार्या वाहतुकीत बदल करत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. शेंडी अथवा भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश देण्यात आलेला आहे. तर चिंचोडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी/भंडारदरा स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा मार्गे एकेरी वाहतूक असून इच्छितस्थळी जाता येणार आहे.
सदर वाहतुकीचा बदल स्वातंत्र्यदिनी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत लागू असणार आहे. यातून केवळ रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अग्निशमन यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, वाहनांची तपासणी होणार असल्याचे मद्यपान करू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केले आहे.