शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर ठेकेदाराकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील बंधाऱ्याचे काम करणारे घुले कन्स्ट्रक्शन कंपनीचे श्रीकांत दिगंबर कवडे यांनी बाजीराव दराडे यांच्याविरुद्ध खंडणी मागत असल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी बाजीराव दराडे व संजय दराडे यांचेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘२३ डिसेंबरला बाजीराव दराडे यांनी आम्ही राजकारणी आहोत. ५० लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर कंपनीची मशिनरी जाळून टाकू व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली,’ अशा आशयाची तक्रार दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रतिक्रिया देताना बाजीराव दराडे यांनी सांगितले की, आपल्या विरुद्धचे राजकीय षडयंत्र आहे. यामागे तालुक्याचे विद्यमान आमदारांचा हात आहे. या प्रकरणात पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची, सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. या प्रकरणाचा न्याय निवाडा होईपर्यंत आपण पक्षातील आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत.-