राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवारी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ येथे आगमन झाले असता त्यावेळी मंचावर सर्वच प्रमुख नेते होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताच एका कार्यकर्त्याने उमेदवारी जाहीर करा, अशी जाहीर मागणी केली. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी असे असेल तर मी माझे भाषण थांबवतो असे म्हणून भाषण थांबविले व ते निघाले. परंतु नंतर काही वेळाने ते पुन्हा भाषणासाठी उभे राहिले.
पाटील यांच्या भाषणापूर्वी एका कार्यकर्त्याने उमेदवारी जाहीर करा अशी मागणी केली. त्यामुळे त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत संबंधित कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले, या मतदारसंघात कुणाला उभे करणार हे जर तुला कळले नसेल तर तुझ्यासारखा वेडा माणूस दुनियेत नाही. तुझ्या बुध्दीची कीव करतो, अशा भाषेत त्या कार्यकर्त्याला फटकारले. आज स्व. अशोक भांगरे असते तर तेच आपले उमेदवार असते असे ते म्हणाले. आपल्याला आघाडी टिकवायची आहे त्यामुळे आघाडीचे जागा वाटप झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवारांची घोषणा केली जाईल असे ते म्हणाले. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
खासदार डॉ.अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार सुनील भुसारा, महेबूब शेख, सुनीता भांगरे, अमित भांगरे, सुरेश गडाख, बी. जे. देशमुख, विनोद हांडे आदी उपस्थित होते.