माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना गळाला लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री व आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांनाही पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पवार आणि पिचड यांच्यात गळाभेट झाल्याची चर्चा असून, या आठवड्यात पवार यांच्या अकोले दौऱ्यात त्याचे काय पडसाद उमटणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
मधुकर पिचड आणि त्यांचे चिंरजीव माजी आमदार वैभव यांनी सन २०१९मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे यांचा विजय झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी स्वतंत्र चूल मांडून महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले.
अकोल्यातील दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त १९ जुलैला अकोल्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शेतकरी मेळावा घेण्यात येणार असून, त्या कार्यक्रमास पवार उपस्थित राहणार आहेत. अशोक भांगरे यांचे चिंरजीव अमित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अकोले विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अमित भांगरे; तसेच त्यांच्या मातुश्री सुनीता भांगरे इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.