आपल्याला सोडणार्या राज्यातील अनेक आमदारांच्या विरोधात दिग्गज नेते शरद पवार यांनी आतापासूनच व्यूहरचना सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील अकोलेत आ. डॉ. किरण लहामटेंना शह देण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे व त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे यांना ताकद देण्याचे ठरविल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील समीकरणे आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे.
आ. लहामटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अशोकराव भांगरे यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमित भांगरे व अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांनी शरद पवार यांची या पार्श्वभूमीवर मुंबई येथे दुसर्यांदा भेट घेतल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भांगरे कुटुंबातील माय-लेकां पैकी कुणा एकाला शरद पवार हे उमेदवारी देऊन आपली राजकीय ताकद त्यांच्या पाठीशी उभी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.