महाराष्ट्रात एकाही पक्षाची उमेदवारी घोषित झाली नाही, पण यांनी केली. यामुळे गटनेते नाही तर देशाचे नेते झाले आहेत अशी खरमरीत टीका जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्यावर माजी आमदार वैभव पिचड यांनी केली. मी विधानसभेसाठी सर्वप्रकारची यावेळी तयारी केली आहे, मी उभा राहणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत रावणाला देव मानणार्या आमदाराचा मी कधीही प्रचार करू शकत नाही, मी श्रीरामाच्या बाजूचा आहे असेही वैभव पिचड यांनी ठणकावून सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा श्रीमंत लॉन व मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनी विद्यमान आमदार व आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते. माजी आमदार पिचड म्हणाले, भगव्या कपड्याची झोळी पुढे करत मदत मागणारे आमदार गावोगावी तिरंगा रॅलीच्या निमित्ताने डी. जे. लावत मिरवणुका काढत आहेत.तर आदिवासी दिन हा सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी पारंपरिक नृत्य, कला सादर करून समाज प्रबोधन पर कार्यक्रम करून साजरा केला पाहिजे. परंतु विद्यमान आमदार यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आदिवासी समाजातील तरुण वर्गाला व्यसनाधिन बनविले असल्याचा आरोप केला.
जालिंदर वाकचौरे यांनी विधानसभेचा उमेदवार घोषित केला, राज्यात आजपर्यंत एकाही पक्षाने आपला उमेदवार घोषित केला नसताना आता ते देशाचे गटनेते झाले आहेत, अशी कोपरखळी माजी आमदार पिचड यांनी त्यांना मारली. 2019 च्या प्रवेशावेळी मी सुचवलेल्या कामांना माझ्या प्रवेशामुळे विधानसभा मतदार संघासाठी निधी मिळाला,माझा पराभव झाला अन् त्या मंजूर कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांनी केला. तोलार खिंड फोडण्याचे दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय झाले ? कृष्णवंती नदीचे पाणी आढळा खोर्यात आणण्याचा निवडणुकी नंतर आमदारांना विसर पडल्याची टीकाही माजी आमदार पिचड यांनी त्यांच्यावर केली. अध्यक्षीय भाषणात विठ्ठलराव लंघे यांनी अजून उमेदवारी बाबत कोणताही निर्णय झाला नसून त्या बैठकीला मी देखील उपस्थित होतो, लवकरच पक्ष शिस्त न पाळणार्या व्यक्तीचा बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे लंघे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केले.