Friday, December 1, 2023

राहुरी तालुक्यातील महत्त्वाचे सर्व कार्यालये एका छताखाली, खा. विखे माजी मंत्री कर्डिले यांचा पुढाकार

राहुरी तालुक्यातील तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, भुमी अभिलेख कार्यालय या सारखी प्रमुख व महत्वाची असणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार असून या भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. खा. डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या जागेची पाहणी केली आहे.

राहुरी शहरा पासून ३ कि. मी. अंतरावर रेल्वे स्टेशन रोडवरील नविन गावठाण हद्दीतील सुमारे ११ हेक्टर क्षेत्र राहुरी नगरपालिकेच्या नावे करण्यात येणार असून यामध्ये राहुरी ग्रामीण रुग्णालय, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती आदी सुसज्ज प्रशासकीय कार्यालये असलेली इमारत बांधली जाणार आहे.

विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून जनता व प्रशासनाच्या सोयीसाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे पंधरा वर्षानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी आराखडा व अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. त्यासाठी खा. डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

जुन्या काळी १८९३ मध्ये तत्कालीन लोकसंख्या व गरज लक्षात घेऊन राहुरी तहसील कार्यालयाची वास्तू बांधली गेली होती. मागील १३० वर्षांत तालुक्याची लोकसंख्या दहा पटींनी वाढली. सध्याच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसायला अथवा जनतेला उभे राहण्यासाठी देखील जागा पुरत नाही. जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. कोणत्याही क्षणी इमारतीचा एखादा भाग कोसळून दुर्घटना होऊ शकते.

इतकी दुरवस्था झाली आहे. जीव मुठीत धरूनच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. २००९ मध्ये ३ हजार ५९ चौरस फुटांच्या बहुमजली प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली होती. परंतु बांधकाम सुरू न झाल्याने २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता रद्द झाली होती. आता विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचालींना वेग आला आला.

महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. डॉ. सुजय विखे व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी नियोजित जागेची पाहणी केली आहे. यावेळी तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, तालुका कृषी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी ताठे, मंडलाधिकारी वैशाली सोनवणे, तलाठी रविंद्र बाचकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: