तेलुगू सिनेमांमधील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या “पुष्पा २: द रुल” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी अल्लू अर्जुन अचानक संध्या थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून त्यात ३५ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मुलगाही गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून आज त्याला अटकही करण्यात आली. तसेच त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने अटकेपासून सुटका मिळविण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान आता या प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा पती भास्कर याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला अल्लू अर्जुनच्या अटकेची माहिती नाही आणि तो अभिनेत्याच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार आहे. माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितले, “अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.”
दरम्यान अल्लू अर्जूनविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल झोनचे पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवधासाठी शिक्षा) नुसार अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कलम ११८ (जाणूनबुजून इतरांच इजा पोहोचवणं) याचीही नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. चिक्कपडल्ली पोलीस स्थानकात मृत महिलेच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
https://x.com/Mugunth1719/status/1867529372774936939?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1867529372774936939%7Ctwgr%5Ec93dddedbfbdcf2782bae5c3e2acd0d315318650%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fbig-twist-in-allu-arjun-arrest-case-husband-of-woman-killed-in-stampede-says-will-withdraw-complaint-kvg-85-4767343%2F
दरम्यान चेंगराचेंगरीच्या घटनेंतर अभिनेता अल्लू अर्जुनने या दुर्घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने म्हटले, “संध्या थिएटरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच या कठीण काळात मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी स्वतःला एकाकी समजू नये, मी स्वतः त्यांची भेट घेईल. पुढील खडतर वाटचालीसाठी जी मदत लागेल, ती मी करेन.”