लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला नाही, तर प्लान बी आहे का? या प्रश्नावर भाजप नेते अमित शहा यांनी थेट उत्तर दिलं आहे. प्लान ए यशस्वी होण्याची शक्यता ६० टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच प्लान बी तयार करण्याची गरज असते. पण मोदी हे प्रचंड बहुमतानं सत्तेवर येतील असा ठाम विश्वास आहे, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपला लोकसभा निवडणूकीत जर बहुमत मिळालं नाही, प्लान बी काय असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाहंनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे.
अमित शाह मुलाखत देताना पुढे म्हणाले की, देश सुरक्षित असावा. संपूर्ण जगात देशाचा सन्मान वाढावा. देश समृद्ध, स्वावलंबी व्हावा. गरिब असो किंवा श्रीमंत असो. संपूर्ण देशाचा विकास झाला पाहिजे. मागील दहा वर्षात जगामध्ये भारताचा मान वाढला आहे. आम्हाला ४०० जागांची गरज आहे. कारण देशाच्या सीमा मजबूत करायच्या आहेत. सशक्त देशासाठी ४०० जागांची गरज आहे. मागील १० वर्षांत बहुमताने कलम ३७० हटवले आणि राम मंदिर बांधल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी राज्यघटना बदलण्याच्या प्रश्नावर बोलताना शहा म्हणाले की, मागील १० वर्षांपासून आपल्याकडे बहुमत आहे. परंतु तसा कधी प्रयत्न केला नाही. पक्षाने (BJP) बहुमताचा गैरवापर केल्याचा इतिहास (PM Modi) नाही. इंदिरा गांधींच्या काळामध्ये काँग्रेसने जनादेशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्यांनी बोलताना केला आहे. तसंच केजरीवालांना क्लीन चीट नाही, त्यांना केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी १० जूनपर्यंत परवानगी दिली असल्याचं शहांनी म्हटलं, अशी माहिती टीव्ही नाईच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
याशिवाय शहांनी ओडिसा आणि काश्मीरबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. ओडिशात सरकार बदलणार आहे. काश्मीरबाबत शहा म्हणाले की, यापूर्वी काश्मीरमध्ये निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे नारे दिले जात होते. यावेळी काश्मीरमध्ये संयमाने मतदान झाले. पहिल्यांदाच ४० टक्के काश्मिरी पंडितांनी मतदान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.