महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी नगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवावी, अशा आशयाचे फलक लागले आहे. हे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यावरून तर्क-वितर्कही काढले जात आहेत. भाजप नेत्यांपाठोपाठ ‘मनसे’तही राज्यस्तरीय नेत्यांना आवाहन केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत. दिल्ली दरवाजा परिसरात तसेच शहराच्या इतर भागात हे फलक डकवले आहेत. त्यावरील मजकूरही चर्चेला कारणीभूत ठरत आहे. मध्यंतरी ठाकरे यांनी नगरचा दौरा केला होता. तोही या मागणीला संदर्भ आहे का, याचाही तर्क लावला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. कोण कोणत्या पक्षाकडून किंवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याचे आडाखे बांधायला सुरूवात झाली असतानाच थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच नगरमध्ये लढण्याचे आवाहन केले जात आहे.