आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनेही दंड थोपटले आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध मतदारसंघात मनसेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे. मनसे नेत्यांच्या आग्रहानंतर अमित ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडुकीत अमित ठाकरेंनी निवडणुकीत उतरावं, अशी मनसे नेत्यांनी बैठकीत इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मनसे नेत्यांनी ही मोठी इच्छा व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मनसे नेते आग्रही असल्याची माहिती मिळाली आहे. अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवल्यास ते राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या तीन विधानसभा मतदारसंघात दादर माहीम मतदारसंघ, भांडुप मतदारसंघ, मागाठाणे या मतदारसंघाचा समावेश आहे.