अजित पवार यांनी राष्ट्रवातीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह ९ मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार दिसले. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही समावेश होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले. मात्र, सोमवारी (३ जुलै) अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं. आता त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचं जाहीर केलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत ते बोलत होते.
आतला आवाज ऐकत शरद पवारांबरोबर असल्याचं जाहीर करत असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी त्यांनी शपथविधीच्या हजेरीवरही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी वेगळ्या कामासाठी अजित पवारांकडे गेलो होतो. तेथे गेल्यावर आपल्याला भाजपाबरोबर जावं लागू शकतं असं कानावर घालण्यात आलं होतं. मात्र, लगेच शपथविधी आहे हे माहिती नव्हतं.”
शपथविधी कार्यक्रमाला राजभवनात गेले तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितलं होतं. कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. शिरूर मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून देताना एका विचारधारेवर विश्वास ठेवला आहे,” असं मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं.अमोल कोल्हे मंगळवारी (४ जुलै) शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याच भेटीत ते आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे सुपुर्त करतील