अहमदनगर-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संगमनेर तहसील कार्यालयातील आस्थापना लिपीक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मोबाईलवरून शिवीगाळ करून वादग्रस्त संदेश पाठवल्याची घटना घडली आहे. त्यानंतर नारायणगावच्या पोलिसांनी तातडीने संगमनेर येथे येऊन रात्री उशिरा या कर्मचाऱ्यास ताब्यात घेऊन नारायणगावला नेले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की संगमनेर तहसील कार्यालयामधील एका कर्मचाऱ्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मोबाईलवरून दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ केली होती. यानंतर त्याने पुन्हा खासदार कोल्हेंना वादग्रस्त संदेश पाठवला. याबाबत नारायणगाव पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.पोलिसांनी संगमनेर येथे येऊन शिवीगाळ करणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्या मोबाईलवरून शिवीगाळ करण्यात आली तो नंबर पोलिसांना देण्यात आला होता. यानंतर नारायणगाव पोलिसांनी काल संध्याकाळी संगमनेर येथे येऊन शिवीगाळ करणाऱ्याचा शोध सुरू केला.
संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरा मोबाईलच्या साह्याने शोध घेतला असता शिवीगाळ करणाऱ्याचे ठिकाण प्रथम संगमनेरच्या क्रीडा संकुलवर दाखविण्यात आले. याठिकाणी तो सापडला नाही. यानंतर पोलिसांनी पुन्हा ठिकाण पाहिले असता वकील कॉलनी परिसरात त्याचे ठिकाण दाखविण्यात आले. नारायणगाव पोलिसांनी वकील कॉलनी परिसरात चौकशी केली असता शिवीगाळ करणाऱ्याचे घर पोलिसांना सापडले.
पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तो झोपलेला होता. पोलिसांनी त्याला उठवून ताब्यात घेतले. शिवीगाळ करण्यात आलेला मोबाईल संगमनेर तहसील कार्यालयात आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा असल्याचे प्राथमिक तपासात समजले. परंतु, आपण फोन केला नसल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून कोणी फोन केला याचा तपास पोलीस करत आहे.