महाराष्ट्र सरकारचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतो आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. ज्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंना टाडा कायद्या अन्वये अटक करावी, सरकारने तशी हिंमत दाखवावी अशी मागणी केली आहे. अमरावतीत ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यानंतर सरकारने हिंमत दाखवून राज ठाकरेंना अटक केली पाहिजे असं म्हटलं आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीवर टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न पाहता त्यांना तुरुंगात टाकून मोकळं झालं पाहिजे. टाडा तर तातडीने लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवून त्यांना अटक करावी असं प्रकाश आंबेडकर ( ) यांनी म्हटलं आहे.