गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत गणपती विसर्जनाची धूम आहे. दादर, वर्सोवा, गिरगाव चौपाटी आणि भाऊच्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात बाप्पाचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. काही मोठ्या सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी समुद्र किनारा स्वच्छतेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्याज फाऊंडेशनने वर्सोवा येथे सकाळी साडेसहा वाजता समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलंय.
याबाबत मंगल प्रभात लोढा म्हणाले, “दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करता. आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा. अमृता फडणवीसांनी आता माँचं (आईचं) रुप घेतलं आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, माँ अमृता असं संबोधणार आहे”, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
अमृता फडणवीसांच्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभातक लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि अभिनेता आयुष्मान खुराणा उपस्थित होते.