पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून तिघांनी एकाला बळजबरीने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावात घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विष पाजणारा आरोपी हा फिर्यादीचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे ‘सख्खा भाऊ झाला पक्का वैरी’या म्हणीची प्रचीती आली आहे.
याबाबत खंडू सीताराम भालसिंग (वय ५०, रा. वाळकी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी खंडू भालसिंग हे दिव्यांग असून त्यांचे व शंकर सीताराम भालसिंग यांचे रविवारी (दि.१९) दुपारी वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याचा राग मनात धरून शंकर सीताराम भालसिंग त्याचा मुलगा नितीन शंकर भालसिंग व पत्नी मीना शंकर भालसिंग यांनी रात्री ९.३० च्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली.
तसेच तु आमच्या वर केसेस करतो काय, दुपारी तुला कमी मारले पण आता जीवे ठार मारतो असे म्हणत शंकर आणि नितीन या दोघांनी त्यांना पकडले. त्यांनी खिशात आणलेली विषारी औषधाची बाटली काढून बळजबरीने औषध फिर्यादीच्या तोंडात ओतले. यावेळी घरात असलेली फिर्यादीची पत्नी सुनिता ही त्यांना वाचविण्यासाठी धावली असता मीना भालसिंग हिने तिला मध्येच पकडत मारहाण केली व तेथेच दाबून धरले.
फिर्यादीला विषारी औषध पाजून ते तिघे शिवीगाळ करत निघून गेले. फिर्यादीच्या पोटात विषारी औषध गेल्याने त्यांना त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यावर त्यांनी गुरुवारी (दि.२४) नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ४५२, ३२३, ५०४, ३४ सह अपंग अधिनियम कलम ९२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.