बीड जिल्ह्यातील एक ना अनेक बातम्या पाहिल्या आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासह ओबीसी आरक्षण बचाव यासाठी एक ना अनेक आंदोलने पाहिले आहेत. आणि याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्काराचे भाष्य देखील झाले. एकीकडे हे सगळं सुरू असताना, दुसरीकडे बीडच्या सुर्डी गावात मोबाईल रेंज आणि टॉवर नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा आता नागरिकांनी दिलाय.
सध्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं साधन म्हणजे मोबाईल आहे. या मोबाईलमुळे जग जवळ आलंय. एका क्षणात कुठे काय सुरू आहे? हे याच मोबाईल मधून पाहायला मिळतं. चांगलं काम असो की इतर कोणतेही काम या मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. मात्र एकीकडे देश महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे मात्र बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या सुरडी गावात आजतागायत एकही टावर उभा नाही. यामुळे मोबाईल असूनही रेंज नसल्याने ग्रामस्थांचे अनेक कामे खोळंबली जात आहेत. यामुळे आता सुरडी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्येच मंजूर करून घेतलाय.
इंटरनेट आणि धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल ही अतिशय जवळची वस्तू आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासह इंटरनेटच्या या जगात, कुठं काय सुरू आहे, हे मोबाईल वरूनच माहिती मिळते. मात्र तोच मोबाईल गावात आल्यावर काम करत नाही. यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत या मोबाईलची रेंज डोकेदुखी बनली आहे. तर ही रेंज मिळवण्यासाठी गावात टॉवर उभाराव यासाठी गेल्या 20 वर्षापासून ग्रामस्थ पुरावा करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत टॉवर उभा करण्यात आलं नाही. यामुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याविषयी सैन्य दलात काम करणाऱ्या जवानाने म्हटलं आहे की, आजकाल संपुर्ण जगभरात रेंज आहे, मी बाॅर्डवर असून तिथं देखील रेंज आहे. पण माझ्या गावात रेंज नाही, याची मला खूप खंत आहे. माझा कुटुंबाशी संपर्क व्हावा म्हणून मला माझं कुटूंब मला आष्टी शहरात स्थाईक करण्याची वेळ आली आहे. तेव्हा तात्काळ टावर बसून द्यावे, अशी प्रतिक्रिया सैनिक सुभाष गर्जे यांनी व्यक्त केली आहे.