अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गेल्या सव्वा महिन्यांपासून संप सुरु आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत संपावर असलेल्या सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासात कामावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र याला बुधवारी (दि.10) सेविका, मदतनीस यांनी लेखी उत्तर देत संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा संप सुरु आहे. संपाला सव्वा महिना झाला. तरी अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना पूरक पोषण आहार, शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार, आरोग्य तपासणी, विविध लसीकरण आदी सेवा पुरवल्या जातात. ज्या संपामुळे सव्वा महिन्यांपासून बंद आहे. या संपावर तोडगा निघने गरजेचे होते. मात्र तोडगा न निघाल्याने राज्य शासनाने उलट संपावरील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 24 तासात कामावर हजर रहावे, अन्यथा कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाकडे पाठवण्यात येईल असे कळविले आहे.प्रशासनाने दिलेल्या नोटिसामुळे संपावरील सेविका आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी लेखी उत्तर देत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.