लोकसभा निवडणूक पुढील काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेत आतापासूनच पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स, बँनर्स लावले जात आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या, ठाकरे परिवाराच्या स्नुषा व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांचे इंदापूर तालुक्यामध्ये भावी खासदार चे फ्लेक्स झळकले आहेत. हे फ्लेक्स सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल होत असल्याने अंकिता पाटील यांच्या नावाची चर्चा आता सुरु झाली आहे.
बारामतीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीतर्फे महादेव जानकर व 2019 च्या निवडणूकीमध्ये कांचन राहुल कुल यांनी निवडणूक लढवली होती.सध्या अंकिता पाटील यांच्याकडे भाजप युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही जबाबदारी स्वीकारून अंकिता यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावी खासदार असे फ्लेक्स लावण्यात आले असून सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी भावी खासदार अशा पोस्ट तयार केलेल्या आहेत.