काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी आण्णा हजारे यांच्यावर केली होती. दरम्यान, या टीकेला आता आण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली”, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं.
पुढे बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला. “शरद पवार यांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती. मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच”, असं अण्णा हजारे म्हणाले.