राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांनी कोर्टात तसा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अगदी शरद पवार गटातूनही अण्णा हजारे यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात मी कोर्टात जाणार असल्याचं वाचल्यानंतर मला धक्काच बसला, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आल्याच्या मुद्द्यावर मी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मी कोर्टात जाईल असंही म्हटलं नाही. तरीही माझ्या नावाने प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. माझं नाव आल्याचं ऐकून मला धक्का बसला आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.