मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यात मोठा उद्रेक झाला अन् जरांगे पाटील हे नाव चर्चेत आहे. आज वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी गेल्या एका वर्षाच्या आंदोलनावर भाष्य केले. तसेच काहीही झाले तरी आरक्षण मिळवून देणार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
“एका वर्षात आपल्याला काय मिळालं आणि काय मिळवायचं आहे. आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून का एक होत नाही हे काळजाला लागायचं. कुठेतरी वाटायचं समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे. 29 ऑगस्ट 2023 ला क्रांती झाली शहागडच्या पैठण फाट्यावर उठाव झाला. मराठा एक होत नाही हे चॅलेंज होतं नेमकी मराठा एक झाला, मराठा समाज एकजूट आहे हाच आयुष्याचा आनंद आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तसेच “मराठ्यांनी सगळं सरकार पागल करून टाकलं आहे. जडी बुटीवाला छगन भुजबळ यांच्याकडून गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. मराठ्याच्या ह्या आंदोलनामुळे दहा टक्के आरक्षण मिळाले ते आपल्याला मान्य नाही. देवेंद्र फडणवीस विचित्र नेते आहेत. आपल्याला दहा टक्के आरक्षण मान्य नाही पण ते आपल्यावर लादलं. कोणी काही म्हणू द्या पण गावच्या गाव कुणबी नोंदी मिळाल्या, दीड पावणे दोन कोटी लोक आरक्षणात गेले शंभर टक्के आंदोलन यशस्वी झालं. दिवस बदलतात देवेंद्र फडणवीस दम धरा,” असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला.