Tuesday, June 25, 2024

नगर जिल्ह्यातील आणखी एका संस्थेने ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक, चेअरमनसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर – नगर शहरासह जिल्हाभरातील ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ध्येय मल्टीस्टेट निधी प्रा.लि. या संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना नगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड संस्थेने ठेवीदारांचे लाखो रुपये बुडविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शेवगाव येथील अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड संस्थेच्या चेअरमन व संचालक अशा ८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संस्थेचे चेअरमन संभाजी विठ्ठल शिंदे, संचालक बाळासाहेब सुभाष पवार, डॉ. प्रदीप साहेबराव उगले, आजिनाथ मच्छिंद्र बर्डे, सुनील विष्णुपंत थोटे, बाबासाहेब लक्ष्मण मुगुटमल, सुनील शेषराव दसपुते, राजेंद्र अशोक उदागे (सर्व रा.शेवगाव) यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती नर्मदा कल्याणराव काटे (वय ५९, रा. खंडोबा नगर, आखेगाव रोड, शेवगाव) यांनी मंगळवारी (दि.२१) रात्री शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी काटे यांनी शेवगाव येथील अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड या संस्थेत ९० लाख ७३ हजार १२८ रुपये ठेव ठेवलेली होती. या ठेवीची मुदत संपल्यावर त्यांनी ठेवीच्या परताव्यासाठी सन २०२२ मध्ये व सन २०२३ मध्ये वारंवार अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड शेवगाव येथे जाऊन तेथील संचालक मंडळ यांना भेटून ठेवीची रक्कम व व्याजाची मागणी केली असता त्यांनी फिर्यादीस आज देतो उद्या देतो असे म्हणून वेळोवेळी पुढील वायदा करून फिर्यादीची ठेवीची मूळ रक्कम अथवा व्याज देण्यास टाळाटाळ केली.

तसेच संस्थेचे चेअरमन संभाजी विठ्ठल शिंदे यांनी फिर्यादी यांना अभ्योदय बँक अहमदनगर या बँकेचे चार चेक त्यांच्या स्वतःच्या सहीने दिले. ते चेक फिर्यादी यांनी त्यांच्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या खात्यामध्ये वटवण्यास गेले असता सदरचे चारही चेक वटले नाहीत. त्यानंतर फिर्यादी अनेक वेळा त्यांच्याकडे ठेवीची रक्कम व व्याजाबद्दल पाठपुरावा करून मागणी केली असता त्यांनी अद्याप पावेतो फिर्यादी यांना कोणतीही रक्कम दिलेली नाही.

सदर संस्थेच्या संचालक मंडळाने फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांना त्यांच्या संस्थेमध्ये मुदत ठेव पावत्या करायला सांगून जास्त टक्केवारीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या संस्थेमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून फिर्यादीच्या पैशाचा अपहार केला आहे व फिर्यादी यांनी गुंतवलेले पैसे अथवा त्याच्या व्याजापैकी एकही रक्कम परत न करता फसवणूक केली. याबाबत फिर्यादी काटे यांनी अप्पर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. त्या अर्जाच्या चौकशी नंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार चेअरमन व संचालकांवर भा.दं. वि. कलम ४२०, ४०६ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एम पी आय डी)१९९९ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles