मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्यास परवानगी देऊ नका, असं निवेदन अंतरवाली सराटी गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. या निवेदनावर गावातील काही नागरिकांच्या सह्या देखील होत्या. त्यानंतर पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली. मात्र, आता अंतरवाली सराटीतील वारं फिरलं आहे. सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे.
त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा कायदेशीर मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
येत्या ४ जूनपासून मी आमरण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील उपसरपंच आणि ५ ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला होता. आंदोलनामुळे गावात जातीय तेढ निर्माण होऊ शकतं.
तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास होऊ शकतो, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. या निवेदनावर अनेकांच्या सह्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली होती.तरीही जरांगे उपोषणावर ठामच आहे.गावातील काही लोकांना हाताशी धरून सरकार षडयंत्र रचत आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला अनुसरून आज अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची विशेष बैठक बोलावली. यावेळी मतदान देखील घेण्यात आलं.
तेव्हा मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या बाजूने ५ सदस्यांनी मतदान केलं. तर इतर ५ सदस्यांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अखेर पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे त्यांच्या उपोषणासाठीची प्रशासकीय अडचण दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पोलीस याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.