अहमदनगर-येथील दिल्लीगेट परिसरात नीलक्रांती चौकाजवळ असलेल्या पान टपरीवर किरकोळ वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. यात तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत या चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हर्षद अशोक भोसले (वय 26, रा. निलक्रांती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज साळवे (रा. सर्जेपुरा) व सनी काते (रा. सावेडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्र कश्यप साळवे सोबत कॅफे किंग समोरील हनुमान पान टपरीसमोर मावा घेत असताना बाजूला सरक असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याचे उद्देशाने धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सनी अनिल काते (वय 24, रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षद अशोक भोसले, कश्यप साळवे (दोघे रा. निलक्रांती चौक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज हरिभाऊ साळवे (वय 24) याच्या समवेत निलक्रांती चौकात हनुमान पान स्टॉल येथे पान खाण्यास गेले असताना दोघांनी शिवीगाळ करून आम्हा दोघांवर धारदार वस्तूने छातीवर, पोटावर, दंडावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.