एकीकडे राज्यातील लोकसभा निवडणुकीत एकही जागा न मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रीय पातळीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा विजय संपादन केला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ आमदार निवडून आले आहेत.
अरुणाचल प्रदेशमधील ५० विधानसभा मतदार संघांसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. ६० जागांच्या विधानसभेत १० जागा भारतीय जनता पक्षाने आधीच बिनविरोध केल्याने फक्त ५० जागांवरील मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे याचोली विधानसभा मतदार संघातून टोको तातुंग यांनी 228 मतांनी विजय नोंदवला आहे. तर लेकांग मतदार संघातून लिहा सोनीय यांनी विजय संपादन केला आहे. त्याचबरोबर बोर्डुमसा-दियुं मतदार संघातून निख कामीं हे विजयी झाले आहेत. या निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला. पक्ष फुटीनंतर दादांकडे गेलेल्या राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ६० पैकी ४६ आमदार जिंकत विधानसभेतील आपली सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. या निवडणुकीत भाजपचे ४६, नॅशनल पीपल्स पार्टी ५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल २, काँग्रेस १आणि ३ अपक्ष उमेदवार विजयी झालेत.