पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषद सदस्य केलं. त्यानंतर आता त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.
भाजप विधान परिषदेच्या सदस्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर मत मांडलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हा संघटनेचा दौरा आहे. १०० ते १५० पदाधिकारी बैठकीला असतील आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. विधानसभेची ही पूर्व तयारी आहे’.