Sunday, September 15, 2024

प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा स्थगित ,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आश्वासन

अहमदनगर -प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा पातळीवर असणारे विषय सोडवण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. यात अनेक महत्त्वाचे विषय असून लवकरात लवकर बदल्यांची प्रक्रिया राबवून त्यात पात्र शिक्षकांच्या बदल्या समुदेशनाने बदली करणे, हजेरीच्या क्यूआर कोड, मिशन आरंभ यासह अन्य विषयांचा समावेश आहे. जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिल्याने 6 तारखेचा शिक्षकांचा जिल्हा परिषदेवरील मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे प्रमुख संजय कळमकर यांनी दिली.

रविवारी (दि.1) दुपारी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक समन्वय समितीची सुमारे एक तास बैठक झाली. यावेळी प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, उपशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे तर प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने संजय कळमकर, रावसाहेब रोहकले, दत्ता कुलट, सिताराम सावंत, एकनाथ व्यवहारे, प्रवीण ठुबे, राजेंद्र शिंदे, संजय धामणे, अनिल आंधळे, आबा लोंढे, सुनील पवळे, दत्ता जाधव, विशाल खरमाळे, रघुनाथ झावरे, सुनील शिंदे, बाळू कोतकर, ऋषीकेश गोरे, भास्कर नरसाळे, नवनाथ तोडमल, बाळासाहेब रोहकले, गणेश वाघ, बाळासाहेब धरम यांच्यासह शिक्षक प्रतिनिधी हजर होते.

यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. शिक्षक समन्वय समितीने त्यांचे प्रश्न मांडले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक हे एकाच कुटुंबाचे भाग आहेत. यामुळे येणार्‍या अडचणी आणि प्रश्न यावर वेळोवेळी सुसंवादातून चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. शिक्षक समन्वय समितीने प्रशासनाकडे त्यांच्या अडचणी मांडाव्यात. तसेच राज्य सरकारकडून शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात सुस्पष्ट धोरण नाही, असे असताना केवळ शिक्षक संघटना यांच्या मागणीचा विचार करून बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येईल. शिक्षकांसह ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्या हजेरीचा क्यूआर कोडचा विषय हा पहिल्या टप्प्यात पर्यवेक्षण करणार्‍या यंत्रणेला पूर्णत: सक्तीचा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, यामुळे हा विषय शिक्षकांसाठी नसणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच मिशन आरंभ हे विना दडपण राबवण्यात येईल, असे स्पष्ट केल्यानंतर समन्वय समितीच्यावतीने 6 तारखेचा मोर्चा स्थगित केल्याचे संयुक्त पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. यावेळी प्रशासनाने केलेली शिष्टाई यशस्वी झाली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बैठकी आधी शिक्षक बँकेच्या सभागृहात सर्व शिक्षक नेत्यांची बैठक झाली. यावेळी समन्वय समितीचे सुमारे 50 प्रतिनिधी आणि शिक्षक नेते हजर होते. जिल्हा पातळीवरील शिक्षकांचे प्रश्न सुटल्याने आता शिक्षक समन्वय समिती राज्य पातळीवरील प्रश्नासाठी स्वतंत्रपणे बैठक घेवून राज्य पातळीवरून शिक्षकांवर लादण्यात येणार्‍या विषयांविरोधात निर्णय घेणार असल्याचे संजय कळमकर यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles