नगर (प्रतिनिधी)- आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइन यांच्या पुढाकाराने शनिवार दि.19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अहमदनगर रेल्वे स्थानकावर वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस या आष्टी-नगर-पुणे रेल्वे गाडीचा तमाम जनतेच्या वतीने सूर्यनामा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सब्बन व ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
जनतेच्या वतीने या गाडीचे नामकरण वंदे मराठवाडा डेमु एक्सप्रेस करण्याचा निर्णय संघटनांनी घोषित केला असून, या आंदोलनात स्वयंसेवी संघटना आणि समविचारी जनतेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रेल्वेसेवेमुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार असून, मराठवाड्या मधील विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुण्याच्या शैक्षणिक, औद्योगिक व व्यावसायिक सुविधांचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळू शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर-परळी रेल्वे मार्ग गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ रखडला आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पोळी भाजण्यासाठी या रेल्वे मार्गाचा उदो-उदो केला जातो. आष्टी-जामखेड-बीड-परळी हा शेकडो वर्षे आर्थिक दृष्ट्या मागासलेला भाग आहे. या भागामध्ये अनेकांचा शेती व्यवसाय हा पोटपाण्याचा आणि मुख्य व्यवसाय असल्यामुळे आणि शेती अवर्षण प्रवण भागात मोडत असल्यामुळे या भागातील तमाम जनता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या दुबळी राहिली आहे. बीड जिल्हा पुणे सारख्या प्रगत भागाला आणि संपूर्ण देशातील शहरांना जोडला गेला तर त्यातून क्रांती होऊ शकेल, म्हणून अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाला विशेष महत्त्व असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आष्टी-नगर-पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी सूर्यनामा..
- Advertisement -