नगर शहरासह जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचे चित्र समोर येत आहे. काल रात्री शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सावेडी उपनगरातील प्रसिद्ध अशा बन्सी महाराज मिठाईवाले फर्मचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला आहे. हल्ल्याच्या ठिकाणी एक गावठी पिस्टल आणि एक तलवार सापडली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुरी तालुक्यात वकील दांपत्याची निर्घृणपणे हत्या झाली होती. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात गंभीर गुन्हे, खून, बलात्कार असे गुन्हे सातत्याने घडत असताना नगर जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गुन्हेगारांकडून गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर केल्याचं अनेकदा पुढे येत आहे. तसेच बाहेरील राज्यातून नगर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी बंदुकांचा व्यापार तेजीत असल्याचं बोललं जात आहे.
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास नगर शहरातील सावेडी उपनगरातील किर्लोस्कर कॉलनी मध्ये बन्सीमहाराज मिठाईवाले या फर्मचे संचालक धीरज जोशी यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात धीरज जोशी गंभीर जखमी झाले असून त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एक गावठी पिस्टल तसेच एक तलवार पोलिसांना सापडलेली आहे. या घटनेमुळे एकूणच शहरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या घटनेनंतर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत धीरज जोशी यांच्या प्रकृतीची माहिती रुग्णालयाकडून घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार संग्राम जगताप पोलिसांवर चांगलेच संतापले. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले की राज्यामध्ये एवढ्या गंभीर घटना एकीकडे घडत असताना आता नगर शहरातही प्राणघातक हल्ला होत आहे. या घटनेचा मी निषेध करतो. राज्यातील आणि जिल्ह्यातील या गंभीर घटना पाहता पोलिसांची गोपनीय यंत्रणा कमकुवत ठरत आहे असे म्हणावे लागेल. अशा प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामान्य जनता, व्यापारी हे भीती आणि दहशतीखाली आहेत. यामुळे पोलीस प्रशासना विरोधात एक प्रकारचा असंतोष दिसून येत आहे असा आरोप आ.जगताप यांनी पोलीस प्रशासनावर केला.
वारंवार होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये वापरले जाणारे वेपन्स(गावठी कट्टे) येतात कुठून याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. अशा अनेक प्रकारात पोलीस थातूरमातूर कारवाई करतात. यामागील मुख्य सूत्रधार याचा तपास लागत नाही. काही आरोपींना अटक होते मात्र दोन दिवसात त्यांना जामीनही मिळतो. त्यामुळे कुठेतरी आज पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरासह जिल्ह्यात होणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांनी आता कुठेतरी या वेपन्स विक्रीच्या मुळाशी जाणे गरजेचं आहे. राज्यभर होत असलेल्या अशा गंभीर घटना पाहता राज्यातील नागरिकांमध्ये सुरक्षितता असणं गरजेचं आहे. त्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाया होणं गरजेचं आहे. यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांची आम्ही लवकरच भेट घेणार असल्याचे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.