नगर तालुक्यातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज हॉटेलमध्ये दोन कामगारांत वाद झाले. एकाने दुसर्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. श्रेयस रेवन भागीवंत (वय 18 रा. वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. दरेवाडी फाटा, ता. नगर) असे जखमी कामगार युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचार्यी (पूर्ण नाव, पत्ता नाही) या कामगाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरेवाडी फाटा येथे सुरज लोखंडे यांचे शौर्य चायनीज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर श्रेयस भागीवंत व आचार्यी हे कामगार आहेत. 27 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते दोघे हॉटेलवर असताना दोघेही साफसफाईचे काम करत होते. काऊंटर साफ करण्यावरून आचार्यी याने श्रेयसला शिवीगाळ करून मारहाण केली.
चिकन तोडण्याच्या चाकूने श्रेयसवर दोन ते तीन वेळा वार करून त्याला जखमी केले. जखमी श्रेयसवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांना जबाब दिला असून पोलिसांनी रविवारी (28 जुलै) आचार्यी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.