अहमदनगर -रात्रीच्या वेळी माणुसकीच्या भावनेतून कार मध्ये लिप्ट देणाऱ्या कारचालकाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला जखमी करत त्याचेकडील हुंदाई कंपनीची ऑरा कार, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत पकडत त्यांच्या कडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लुटीची ही घटना सोमवारी (दि.२५) रात्री नगर – पुणे महामार्गावर सुपा परिसरात घडली होती. सचिन बापु पठारे (वय ३५, रा. पिंपळगांव कौडा, ता.नगर) हे त्याचेकडील हुंदाई कंपनीची ऑरा कार (क्र. एम. एच.१२ व्ही. व्ही. ७३३६) मधुन सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.
रात्रीची वेळ असल्याने पठारे यांनी माणुसकीच्या भावनेतून प्रवाशांना गाडीमधे बसवुन घेवुन जात असतांना गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने पठारे यांच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन जखमी केले व त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पो.हे.कॉ.अतुल लोटके, पो.ना.रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पो.कॉ.रणजीत जाधव, रविंद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, प्रशांत राठोड यांचे विशेष पथक तपासासाठी रवाना करण्यात आले.
या पथकाने ठिकठीकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा व गुन्ह्यातील चोरी गेलेली कारचा शोध घेतला असता ती कोपरगांवचे दिशेने गेली असल्याचे दिसुन आले. पथक कोपरगांव परिसरामध्ये कारचा शोध घेत असतांना सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ तेथे धाव घेत कार व आरोपी ताब्यात घेतले.
यामध्ये शिवम मातादीन गौतम (वय २०), दुर्जन अनारसिंग गौतम (वय २३, रा. नगलारगी, ता. पाटीयाली, जि. करजगंज, उत्तरप्रदेश, हल्ली रा. मिंडा कंपनीजवळ सुपा, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. त्यांच्या कडून गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना पुढील तपासकामी सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.