अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे संबंधित आत्महत्या करत होती. परंतु, त्याचवेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस तिथे आले आणि त्यांनी तिचा जीव वाचवला. अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे.
शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी ७ च्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली. तिने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले मुलुंड येथे राहणाऱ्या या ५६ वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असं असून ती देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असं तिने पोलिसांच्या जबानीत म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुलफरोज मुजावर म्हणाले, “आमची पेट्रोलिंग व्हॅन त्याच रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना उभी केलेली कार दिसली. तसेच, शेलार टोल नाक्याच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.”