अहमदनगर येथे हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात अटक न करण्याबरोबरच ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या भावाला सोडून देण्याच्या मोबदल्यात दोन लाखांची लाच मागून दीड लाख स्वीकारण्याची तयारी दर्शविलेल्या एटीएसच्या तत्कालीन पोलिस शिपायास लाचलुचपत प्रतिबधक विभागाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप चव्हाण असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तक्रारदाराच्या भावाला फायरिंगच्या गुन्ह्यात एटीएसने ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्याला अटक न करता सोडून द्यावे म्हणून संदीप चव्हाण याने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड होऊन दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी चव्हाण याने दाखवली होती. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई सापळा अधिकारी गायत्री जाधव, मीरा आदमाणे, संदीप वणवे, ज्योती शार्दूल, परशराम जाधव यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.